Sunday, December 31, 2017

२०१७ सरताना..

आज ३१ डिसेंबर, २०१७ संपायला आता काही तासच शिल्लक आहेत... मनात हे वर्ष संपणार म्हणून हुरहूर आहे.. हि हुरहूर मी दरवर्षी अनुभवते... पण तरी हि ती प्रत्येक वर्षी नकोशी वाटते. एखाद्या कातर संध्याकाळेसारखी!!

डिसेंबर महिना उजाडला कि नवीन वर्षाचे वेध सुरु होतात.. नवीन वर्षाच्या संकल्पा बरोबरच मला सरत्या वर्षीचा आढावा घ्यायला आवडतो. प्रत्येक वर्ष आपल्याला अनुभवाने समृद्ध करत असते. काही गोड, काही कडू आठवणी गाठीशी घेऊन आपण पुढे जात राहतो.

२०१७ची सुरुवात एकदम दणक्यात झाली ती महेशच्या प्रमोशनने! PE, Principle Engineer... मार्च मध्ये प्रमोशन आणि सप्टेंबर मध्ये मॅनेजर म्हणून नवीन रेस्पॉन्सिबिलिटी!! मार्च मध्ये महेशच्या वाढदिवसाला ब्रँड न्यू Lexus कार हि घेतली.

२०१७ मध्ये खूप प्रवास हि केला .. अगदी 'मी प्रवासी' म्हणण्या इतका!!
१ वर्षात ३ स्वतंत्र दिन साजरे केले.. १जुलैला कॅनडाचा १५०वा स्वतंत्र दिन , ४जुलैला अमेरिकेचा आणि १५ऑगस्टला भारताचा!!
जून मध्ये टोरांटो कॅनडा.. फॅमिली गेट टुगेदर ...
BMM बृहन महाराष्ट्र अधिवेशनासाठी  जुलै मध्ये डेट्रॉईट... धम्माल अनुभव..
ऑगस्ट मध्ये भारत दौरा

२०१७ मध्ये ऋचा student of the  month झाली त्याच बरोबर  'disaster magnet' हि पदवी हि मिळाली.. वर्षाच्या सुरुवातीलाच नोज इंज्युरी आणि शेवटी ankle इंज्युरी! बिच्च्चारी.. त्यामुळे swimming चे दोन season गेले तिचे..  आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ती officially "teen ager" झाली!!

माझे म्हणाल तर २०१७ मध्ये finally मी हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली.. खूप वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले. योगा टीचर ट्रेनिंग सुरु केले.. मला मी सापडू लागले असे वाटते आहे.

तब्बेतीच्या तक्रारी, लागण खुपणं हे तर सुरु राहणारच.. त्याचा हिशोब कशाला ठेवायचा? एकूण गोळाबेरीज करता भरपूर सुखद आठवणींचा खजिना घेऊन मी २०१८ मध्ये जाणार आहे... 

Thank You 2017!!

-मी मधुरा..

Wednesday, December 20, 2017

प्रवास माझ्या कवितांचा...

कवितेशी खरी ओळख झाली ती अकरावीत, आमच्या 'कुलकर्णी बाई' मुळे.. त्यापूर्वी पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रमाला आहेत तितक्याच कविता वाचल्या जायच्या. त्यांच्यामुळे अभ्याक्रमाबाहेरच्या कविता वाचायला लागले.. त्यावर चर्चा करायला लागले. शब्दांशी खेळायची सवय त्यांनीच लावली. त्यांच्या प्रोत्साहनामुळे कविता कराव्याश्या वाटू लागल्या.

त्यांनी दिलेल्या ओढ ह्या विषयावर मी केलेली माझी पहिली कविता ....




चंद्रशेखर गोखले त्यांच्या चारोळ्यांनी मनात घर केले. त्यांचे चार ओळीत व्यक्त होणे आवडू लागले.



नंतर कॉलेज मध्ये मैत्रिणी हि अश्या मिळाल्या कि ज्या कवितांमध्येच जगतात. काही जणींच्या कविता  तर कॉलेजच्या काचपेटीत दिमाखात लटकायच्या, कॉलेज स्मरणिकेत झळकायच्या.. मी मात्र नेहमी माझ्या पुरतेच लिहीत राहिले.








कॉलेजच्या शेवटच्या वर्षी मेमरी बुक मध्ये पाहल्यांदाच माझी कविता मी मैत्रिणीसाठी लिहिली.







ग्रॅजुएशन नंतर प्रत्येकीचे मार्ग बदलले. नवीन कोर्स, नवीन मित्रमैत्रिणी मध्ये कविता मागे पडते कि काय असे वाटत असतानाच मनातल्या खास कोणासाठी तरी लिहायला सुरुवात झाली.



महेशला भेटले, लग्न झाले त्यावेळच्या भावना कवितेतून व्यक्त नाही झाल्यातरच नवल होते..




लग्नानंतर कवितांची जागा उखाण्यांनी घेतली. नवीन संसार, नवीन जबाबदाऱ्या ह्या सर्वात कविता कुठे विरून गेली कळलेच नाही. परत तिच्याशी भेट झालीच नाही. पण आता लवकरच भेटेन...

-मी मधुरा...

Thursday, November 30, 2017

Gratitude??? / Appreciation???

November is often called as a "Gratitude Month". At Thanksgiving, we would go around the table and ask the question “What are you grateful for?” .... This is a great way to fill your mind, heart with positive emotions. I have heard of having a gratitude journal where you write the things you are grateful for in your life. 

During a recent conversation in my Yoga Class, the question rose as whether there is a difference between Gratitude and Appreciation and, if so, what would it be? My observation is, we use the word grateful/gratitude and appreciation out of a habit. Somewhere we lost the true sense of these words. Dictionary meaning of "Gratitude" is "the quality of being thankful; readiness to show appreciation for and to return kindness." Does it mean you have to be grateful first to appreciate? My thought is, gratitude is the base from which appreciation grows and flourishes. We can be grateful for something in our lives without really appreciating it. Gratitude is the quality of being thankful... it’s very subtle, it senses struggle which you’ve to overcome. Where as appreciation comes from within. Appreciation is the recognition and enjoyment of the good qualities of someone or something. It sounds "love".. 

Gratitude is a bit less empowering than appreciation. The shift from gratitude to appreciation involves being more present, more thoughtfully aware about what we are grateful for. For example, we can be grateful for having food on our table.  However, going further if we start noticing its beauty, fragrance, taste, nutrition, and preparation, we will start appreciating. We go beyond thankfulness as we recognize the value that food that adds to our lives.

When we truly appreciate, it makes us feel brighter, lighter, happier and loved. It's time to replace my gratitude list with my appreciation list!!



-मी मधुरा...
२९ नोहेंबर २०१७

Monday, October 16, 2017

"आजीचा खाऊ"

शाळा सुरु होऊन महिना झाला सुद्धा! अडीच महिन्याच्या सुट्टी नंतर, जेव्हा शाळा सुरु होते, मुले शाळेत जातात , तेव्हा जीवाला थोडी शांतता मिळणार म्हणून एकीकडे मन खुश असते तर दुसरीकडे 'आता रोज डब्यात काय?' ह्या प्रश्नाला सामोरे जाताना थोडी धाकधूक हि असते. पण ह्यावेळी ऋचाने हा प्रश्न स्वतःहून सोडवला.. 'महिन्याचे लंच आणि स्नॅकचे कॅलेंडर' करून डायरेक्ट माझ्या हातात टेकवले... इतके व्यवस्थित कॅलेंडर पाहून मी थक्कच झाले. अगदी ब्रेकफास्ट पासून ते दुपारच्या स्नॅक पर्यंत सगळे त्यात होते. खाली तळटीप dinner : 'aai's choice' :-) हे झाले वीकडे चे... वीकएंड साठी 'आजीचा खाऊ' (असे मराठीत) किंवा eating out/special dinner असे लिहिले होते.. बापरे.. आता 'आजीचा खाऊ'  हि काय भानगड आहे? इथे कुठून आणू आजी? आणि ती हि खाऊ करणारी....



भारतात असते तर दोन्ही आजीनी वीकेंड च काय तर वीकडेला पण रोज वेगवेगळा खाऊ करून दिला असता.... भूक लागली असे म्हणायची वेळच आली नसती.. शिरा, पोहे, उपमा, वेगवेगळे लाडू.. नुसती ऐश.. wait a minute.. खरंच मी ऐश लिहिले का? आत्ता हि ऐश वाटते आहे पण त्यावेळी किती माजात आईला सांगायचे, 'आई भूक लागली आहे पण मला ते नेहमीचे शिरा-पोहे, चिवडा-लाडू नको.. काही तरी वेगळे कर..'... बिच्चारी आई.. मग ती कधी खमंग भाजणीचं थालीपीठ (वर छान लोण्याचा गोळा) तर कधी धिरडी तर कधी गुळपापडी असे करून द्यायची... घरी सतत कोणाचे न कोणाचे उपवास असल्याने शाबुदाणा खिचडी हा ऑपशन तर असायचाच.. तूप मेतकूट भात, फोडणीचा भात तर शिरा पोहे पेक्षा जास्त जवळचा वाटायचा.. आत्ता मिळणारे मॅग्गी, इन्स्टंट सूप असले पर्याय कधी नव्हतेच.. बाहेर जाऊन खायला रेस्टोरंट नव्हती पण ती कमी कधी जाणवली नाही. काही बदल, काही नवीन खावे वाटले तर आई नामक जेनी घरीच इडली, डोसा, पराठे, टोमॅटो ऑम्लेट, भेळ, पावभाजी असे प्रकार करायची.

अजुनी हि जेनी प्रत्येक भारतवारीच्या वेळी "मधा, तुला काय काय घेऊन जायचे आहे त्याची यादी पाठव हं.. म्हणजे माझ्या सवडीने मी सगळे करून ठेवेन". असे न चुकता सांगते. तिला कितीही सांगितले, आई तू नको हा व्याप करू, मी विकतचे घेऊन जाईन. ह्यावर तिचे ठरलेले उत्तर.. "मी आहे तोवर घेऊन जा नंतर आहेच विकतचे" कधी कधी प्रश्न पडतो का करतात आया असे? का इतके करतच राहतात? असो. विषयांतर नको.. नाहीतर ह्या विचारात "आजीचा खाऊ" मागे राहायचा..

शेवटी मी ऋचाला विचारले "आजीचा खाऊ" म्हणजे नक्की काय? तर म्हणाली अग, नाही का मला आवडते म्हणून आजीने ते काय काय दिले आहे, ते म्हणजे "आईचा खाऊ!" मला तिच्या उत्तराची कमाल वाटली.. खरंच ऋचाला आवडते म्हणून आई काय काय देत असते... थालीपीठाची भाजणी, चकली भाजणी, आंबोळ्यांचे पीठ, धिरड्याचे पीठ, लिंबाचे गोडे लोणचे, मेतकूट आणि ते  हि सगळे स्वतःच्या हातचे.. घरी केलेले. नाही म्हणून चालतच नाही. अग तुझ्यासाठी नाही माझ्या नातीसाठी करते आहे. तुझी मुलगी, ना कसल्या पोळ्या खाते ना कसले लाडू, ना कसल्या खिरी. जे खाते ते तरी घेऊन जा.. असे बोलून निरुत्तर करते... हो बाई कर.. तू केल्या शिवाय तुझ्या नातीला काही चांगले चुंगले खायला मिळायचे नाही. असे म्हणण्याशिवाय पर्याय राहत नाही.

ऋचाने दिलेले "आजीचा खाऊ" हे नाव एकदम पटले!! आजी जे कौतुकाने खाण्यासाठी देते तो खाऊ, "आजीचा खाऊ".. आपली खाद्य संस्कृती समृद्ध करून पुढच्या पिढीत ती पोचवणाऱ्या ह्या माउलीला हे सांगायलाच हवे.... पण त्या आधी आई ब्रँड सॉरी सॉरी आजी ब्रँड गोडामसाल्याची गरम आमटी, आजी ब्रँड  भाजणीत घोळवलेले वांग्याचे काप आणि भात असा फक्कड बेत करते... आणि मग तृप्त मानाने सांगते "तू ह्या जगातील बेस्ट कूक आहेस.. we love you and we love your खाऊ "आजीचा खाऊ"!!"

-मी मधुरा...
१५ सप्टेंबर २०१९


Friday, October 6, 2017

आई निघाली शाळेला..

'आई निघाली शाळेला' असे वाचून गम्मत वाटली असेल ना? आजकालच्या मुलांना आई शाळेत जाणे काही नवीन गोष्ट राहिली नाही. कधी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन साठी तर कधी जॉब मधील नवीन स्किल्स आत्मसात करायला आईला शाळेत जावे लागते. पण आमच्याकडे आई काही वेगळ्याच कारणासाठी शाळेत चालली आहे.. आमची हि आई 'योगा टीचर ट्रैनिंग' करणार आहे. ह्यातील 'टीचर' ह्या पार्ट बद्दल अजुनी ती शाशंक असली तरी योगाचे पूर्ण ज्ञान मिळवण्यासाठी ती आतुर आहे. हि आई दुसरी कोणी नसून खुद्द 'मी'च आहे.


तर मी २०० तासाचे योगा टीचर्स ट्रेंनिंग करते आहे. साडेचार महिन्याच्या ह्या प्रवासाची सुरुवात उद्यापासून होईल. कोर्सला ऍडमिशन घेतल्यापासून 'दिल योगा योगा हो गया' असे काहीसे झाले आहे. वह्या, पुस्तके, नवीन कपडे,नवीन योगा मॅट त्याच बरोबर हे सगळे घेऊन जायला एक दप्तर काही विचारू नका... नवीन पुस्तकांचा वास किती छान असतो ना? हा वास मला नेहमी शाळेच्या दिवसात घेऊन जातो... तसे शाळेच्या तयारीचे हे मंतरलेले दिवस दरवर्षी जूनच्या सुरवातीला आठवतात. शाळेने दिलेल्या पुस्तके वह्याच्या लिस्ट बरोबर मारुतीच्या शेपटी प्रमाणे माझी वाढत जाणारी लिस्ट हि आठवते.. कंपासपेटी, नवीन युनिफॉर्म, नवीन दप्तराची खरेदी, लंच बॉक्स वॉटर बॉटल बरोबरच रेनकोट, छत्री, गमबूट...  


ह्या सगळ्यात माझी आवडती गोष्ट कोणती असेल तर वह्या पुस्तकांना कव्हर घालणे. अगदी लहान असताना बाबा पुस्तकांना कव्हर घालून द्यायचे. त्यांचे पाहून हळू हळू मी पण एकदम प्रो झाले. बाबांना दर शुक्रवारी सुट्टी असायची. त्यामुळे शाळा सुरु होण्या आधीचा शुक्रवार खास कव्हर घालण्यासाठी राखीव असायचा. विटकरी रंगाचा मोठ्ठा पेपर रोल आणला जायचा. कात्री, चिकटपट्टी, नावाचे स्टिकर्स सगळे घेऊन आम्ही मदत करायला सज्ज व्हायचो. हा कार्यक्रम चांगला दोन तीन तास चालायचा. नवीन वह्या पुस्तकाच्या वासाच्या धुंदीत वेळ कसा जायचा तेच कळायचे नाही. शाळा संपली आणि हे मंतरलेपण हि संपले. ऋचाला शाळेची पुस्तके घरी मिळत नसल्याने परत कधी कव्हर घालायची वेळच आली नाही. पण आता माझी कोर्स बुक्स पाहून परत कव्हर घालायची इच्छा होते आहे.. निदान एखाद्या पुस्तकाला तरी कव्हर घालून बघेन.


सगळी तयारी झाली असली तरी शाळेच्या पहिल्या दिवशीची हुरहूर मनात आहेच. क्लासमेट्स कोण असतील? टीचर्स कसे असतील? बाकी सगळे सांभाळून हे करायला जमेल ना? असे असंख्य प्रश्न मनात आहेत. पण उत्साह हि तेवढाच आहे.आता हि आई विद्यार्थिनींची जबाबदारी किती समर्थपणे पेलते हे पाहायचे..


-मी मधुरा...
६ ऑक्टोबर २०१७


Tuesday, October 3, 2017

परवलीचा शब्द/ संकेताक्षर

आज खूप दिवसांनी मायबोली साईटवर फेरफटका मारला तेव्हा 'परवलीचा शब्द' हे वाचून कोण आनंद झाला म्हणून सांगू.. ह्या शब्दाशी माझी पहिली ओळख मायबोलीमुळेच झाली आणि पहिल्या भेटीतच हा शब्द खूप भावला.. पासवर्ड ला मराठीत 'संकेताक्षर' म्हणतात हे माहिती होते पण 'परवलीचा शब्द' हे जरा हटकेच वाटले. अजुनही मला 'परवली' चा नेमका अर्थ माहिती नाही. तरी हि हा शब्द आपलासा वाटतो.


खरंच ह्या 'परवलीच्या शब्दा' ने आपले आयुष्य किती बदलले आहे ना.. आपले दैनंदिन आयुष्य अगदी व्यापून टाकले आहे. डिजिटल की, फिंगर प्रिंट हि मंडळी ह्याच भावकुळीतील!! माझा ह्या शब्दाशी परिचय झाला तो १९९२-९३ मध्ये! सांगलीत कॉम्पुटरचे वारे नुकतेच वाहू लागले होते.. आमच्या सारख्या कॉमर्स ग्रॅज्युएट साठी टायपिंग स्पीड बरोबर कॉम्पुटर ऑपरेटिंग येणे हा हुकमी एक्का होता. मग काय आमचे पाय आपसूकच त्या दिशेने वळाले. रितसर क्लासला ऍडमिशन घेतली... क्लास म्हणजे, एक ए.सी. रूम, रूम मध्ये आठ दहा कॉम्पुटर आणि त्या कॉम्पुटर वर त्या मशीनचे नाव आणि पासवर्ड.. आता आपला कॉम्पुटर आपण पासवर्ड वैगरे टाकून सुरु करायचा, wow!! किती छान!! असे नाही कि कॉम्पुटर कधी पहिला नव्हता पण कॉम्पुटरशी फक्त आणि फक्त गेम खेळण्यापुरता संबंध होता आणि तो हि बाबा तो सुरु करून द्यायचे. असो. तर त्यावेळी पासवर्ड हे प्रकरण उघडे पुस्तक असायचे. कधी कोणी मुद्दाम पासवर्ड बदलायचे..उगाचच त्रास देण्यासाठी.. आणि मग ह्या मशीनचा पासवर्ड काय म्हणून दंगा चालायचा. प्रोजेक्टसाठी जेव्हा स्वतः एक पासवर्ड प्रोग्रॅम केला तेव्हा लै भारी फीलिंग आले होते.

माझा स्वतःचा सिक्रेट पासवर्ड मिळाला तो १९९६ मध्ये जेव्हा मी emial account काढले. आणि तो गमतीचा शब्द, गमतीचा न राहता सिक्रेट झाला. मग हळू हळू ह्या शब्दाचे महत्व वाढतच गेले. बँक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, सेल फोन्स, कॉम्पुटर, लॅपटॉप्स अश्या अनेक गोष्टींची किल्ली म्हणजे हा पासवर्ड झाला.. जितकी साधने तितके पासवार्ड्स.. आणि ते लक्षात ठेवण्याची जबाबदारी हि! काही पासवार्ड्स फक्त अंकांचे तर काही अंक आणि अक्षरे यांती युती दर्शवणारे! कमीतकमी इतकी अक्षरे, इतके अंक असे नियम पळत एकदाचा पासवर्ड तयार होतो. काही काही वेळा ठराविक कालावधी नंतर नवीन पासवर्ड तयार करावा लागतो. दरवेळी काय करणार नवीन??.. स्वतःचे नाव, आसपासच्या सगळ्यांची नावे, जन्मतारखा, मुळगाव, शाळा इरुन फिरून गाडी तिकडेच येते. कल्पनाशक्तीचा कस लागतो. पासवर्ड विसरला तर तो परत मिळवतानाची कथा वेगळीच. अमुक तमुक प्रश्नाची उत्तरे द्या आणि मिळावा तुमचाच पासवर्ड तुम्ही परत..

ऋचा लहानपणी पासवर्ड नामक गेम खेळायची. आजचा पासवर्ड सांग मग तुला पप्पी देईन.. पासवर्ड सांग मग उठेन.. पासवर्ड सांग मग मी तुला जाऊ देईन.. असे काही. पण जाम मजा यायची. मुद्दाम चुकीचा पासवर्ड सांगायचा आणि मग ती मला तीन चान्स द्यायची तो ओळखायला तर ठीक नाहीतर आता तू माझ्यावर प्रेमच करत नाहीस असे म्हणून ओठ काढून बसायची. पासवर्डचा असा गेम हि होऊ शकतो असा विचार कोणी तरी केला असेल का?

एकूण काय आपण सगळे ह्याच्या जाळ्यात अडकलेले क्षुद्र जीव आहोत.


-मी मधुरा...
२ ऑक्टोबर २०१७

Saturday, September 23, 2017

नखरा नथीचा..

नथ, माझा अतिशय लाडका दागिना!! मी ह्या दागिन्यांच्या प्रेमात पडले ते आजीच्या नथीमुळे!! माझी आजी दिसायला तर सुंदर होतीच पण तिचे छान चाफेकळी नाक नथ घातल्यावर अजुनी उठून दिसायचे. नथीमुळे तिचे नाक खुलते का तिच्या नाकामुळे नथ हे अगम्य कोडे होते. नथीतले टप्पोरे मोती कधी तिच्या डोळ्यांशी तर कधी तिच्या दातांशी स्पर्धा करत. तिला नथ घालताना पाहण्यात वेगळीच मजा वाटायची... डोळे मिटून नथीचा आकडा हळुवारपणे नाकात घालायची जशी एखादी जादूगिरीणच!!.. डोळे मिटून ती हे कसे करू शकते ते माझ्या बालबुद्धीला काही उमगयाचे नाही. सणवार असेल कि मी तिच्या भोवती घुटमळत राहायचे, कपाटातून दागिने बाहेर काढायची वाट पाहत राहायचे. प्रत्येक सणाला ती नथ घालेलच असे नसायचे पण त्या निमित्याने मला नथ पहायला, हाताळायला मिळायची. 

मला आठवते, मी दुसरी तिसरीत असेन... मी आजीला विचारले होते.. "आजी, मी तुझ्या एवढी मोठ्ठी झाले कि तू मला तुझी नथ घालायला देशील?" त्यावर ती म्हणाली होती "त्यासाठी आधी नाक टोचावे लागते आणि त्या नाकात नथ पेलायची ताकत पण यावी लागते!" मस्तच!! नाक टोचले कि नथ घालायला मिळणार!! आजीने कोडे एकदम उलघडून सांगितले होते. किती सोपे आहे सोनाराकडे जायचे, नाक टोचायचे आणि घरी येऊन नथ घालायची!!

माझी आईच्या मागे 'मला नाक टोचायला घेऊन जा' अशी भुणभुण सुरु झाली. पण त्याकडे तिने सपशेल दुर्लक्ष केले... जेमतेम ८-९ वर्षाची मुलगी, तिच्या अश्या हट्टाकडे कोण लक्ष देणार? आईकडे डाळ शिजत नाही म्हंटल्यावर नाईलाजाने माझे दुसरे पर्यांय शोधणे सुरु झाले.. एका मैत्रीणीने सांगितले कि तिच्या आईने तिचे सुई दोऱ्याने घरीच नाक टोचले आणि ती माझे पण नाक टोचून देईल.. काय सांगू त्यावेळी ती मैत्रीण खूप भारी वाटली होती.. आपसूकच मोर्चा तिच्या घरी वळवला.. "तुझी आई नाही आली? नाक टोचायचे माहिती आहे ना तिला ?" असे विचारून दारातूनच माझी बोळवण  झाली. एवढेसे नाक टोचायला आई कश्याला बरोबर हवी? हेच कळत नव्हते. शेवटी माझे मीच नाक टोचायचे ठरवले. नथ घालायची तर हे धाडस करावेच लागणार होते.. आईच्या रिळांच्या डब्यातून सुई दोरा मिळवला.. दुपारी निजानीज झाल्यावर काम फत्ते करायचा बेत हि आखला.. पण.. पण.. ती नेमकी वेळ साधण्यात थोडी गडबड झाली आणि मी पकडली गेले.. झाले नथ घातल्याचे स्वप्न धुळीला मिळाले असे वाटत असतानाच आईने सांगितले कि उन्हाळ्याच्या सुट्टीत धारवाड ला गेलो कि तुझे नाक टोचू.. तोवर असले उद्योग नकोत... तिला वाटले असेल कदाचित मी हे सगळे विसरेन आणि नाक टोचणे ह्या प्रकरणावर पडदा पडेल. 

पण तसे झाले नाही.. धारवाडला गेल्यावर परत माझी भुणभुण सुरु झाली.. शेवटी कंटाळून आईने नाक टोचायला हमी भरली.. मग काय, मी, माझी मावस बहीण (तिला हि माझ्यामुळे नाक टोचायची लागण नुकत्यातच झाली होती), आई आणि मावशी अशी आमची वरात पोचली सोनाराच्या दुकानात! कधी एकदा नाक टोचेन असे झाले होते. चिकित्सा करून चमकीने नाक टोचायचे असे ठरले.. मला फक्त नाक टोचण्याशी मतलब होता..चमकी काय आणि तार काय हे अगदी नगण्य होते. चला, कोणाचे आधी नाक टोचायचे? असे विचारताच मी चटकन त्याच्या बाजूच्या स्टुलावर लावून बसले.. "बाळ, तू जरा थांब.. मी आधी ह्या ताईंचे नाक टोचतो" असे म्हणत त्याने रॉकेलचा भगभगता दिवा सुरु केला.. त्यावर चमकीचे टोक धरले, चांगले गरम झाले आहे ह्याची खात्री करून ते टोक खोबऱ्याच्या तुकड्यावर टोचले आणि एकदाची ती चमकी नाकावर खूण केलेल्या ठिकाणी टोचली.. टोचली कसली चांगली खुपसली.. आणि तिच्या ओरडण्याने दुकान दणाणून गेले.. ते पाहून, तेथून पळून जावे असे क्षणभर नक्कीच वाटले. पण त्या नथीसाठी मी ह्या दिव्यातून जायला तयार होते. जरा घाबरतच मी स्टुलावर जाऊन बसले.. आत्तापर्यंत रडणारी ओरडणारी माझी बहीण, छान स्वतःला आरशात निरखत बसली होती! म्हणजे हे जितके दिसले तितके भयानक नाही ह्याची खात्री झाली. नथीच्या भाव विश्वात रंगलेली मी एका टोचण्याने भानावर आले.. पाहते तर काय एक पिटुकला खडा माझ्या नाकावर चमचम करत होता..

हे सगळे अजुनी संपले नव्हते.. नाक टोचल्याची नवलाई पुढच्या दहा मिनिटातच संपली.. नाक खूप दुखत होते.. जड वाटत होते.. पण बोलते कोणाला? स्वतःहून हे सगळे ओढवून घेतले होते ना.. घरी आल्यावर, आईने त्यावर हळद आणि तेल लावून छान कापसाच्या वातीने शेकून दिले.. आणि तात्पुरता आराम मिळाला. दुसऱ्या दिवशी नाक अजुनी जास्त दुखायला लागले.. मोठ्ठ्या फोडामुळे चमकी हि दिसेनाशी झाली.. वाटले काढून टाकावी ती चमकी.. पण मन माघार घ्यायला तयार नव्हते.. चमकी काढायची असेल तरी तो फोड जाई पर्यंत वाट पाहावी लागणार होती.. शेकून, औषध लावून फोड गेला पण इन्फेक्शन तसेच राहिले.. आता ती चमकी काढण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.. नाक टोचताना रडले नाही पण ती कसर चमकी काढल्यावर भरून निघाली.. दुखण्यापेक्षा चमकी काढावी लागली ह्याचा राग, अपमान त्यात जास्ती होता... तेव्हाच ठरवले हार मानायची नाही पुढच्या सुट्टीत परत नाक टोचायचे.

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही.. I mean, मी माझा हट्ट सोडला नाही.. दरवर्षी नाक टोचायचे, काही कारणाने चमकी काढून टाकायची असे पुढची दोन वर्षे सुरु होते.. शेवटी नाकाने शरणागती पत्करली आणि मी अभिमानाने नाकावर चमकी मिरवू लागले. माझ्या आईने आणि त्या सोनाराने ही एकदाचा सुटकेचा निश्वास टाकला..



नाक टोचल्यापासून ते नथ घालेपर्यंत मला बरीच वाट पाहावी लागली. पण मी नथ घातलीच!!... आणि ह्या नथीसाठीच्या घेतलेल्या त्रासाची सांगता झाली. पुढे लग्न ठरल्यावर सासूबाईंनी जेव्हा मला विचारले तुला कोणता दागिना आवडेल? तुझ्यासाठी काय घेऊ? तेव्हा मी त्यांना "नथ" असे पटकन उत्तर दिले. आनंदाची गोष्ट म्हणजे, सासूबाईंनी दिलेली नथ घालून मिरवतानाची साक्षीदार आजी पण होती. आजीच्या नथीपासून सुरु झालेले हे वेडं अजुनी हि कायम आहे. आजीची ती नथ सध्या आईकडे आहे.. जेव्हा ती माझ्याकडे येईल तेव्हा हे वर्तुळ पूर्ण होईल कदाचित 😊







-मी मधुरा... 
२२ सप्टेंबर २०१७ 

Thursday, September 21, 2017

कुणीतरी हवं असतं.....

Congratulations!! you are on my list. now you can not back out..  आज योगा टीचर्स ट्रैनिंगसाठी रजिस्टर केले त्यावेळी डिना, आमची योगा ट्रेनर म्हणाली.. क्षणभर वाटले अजुनी थोडे दिवस थांबायला हवे होते का? खूप घाई तर नाही ना केली? तेवढ्यात ती म्हणाली, I know your abilities and I believe, you will be a good yoga teacher one day . काय माहिती तिने माझ्या चेहऱ्यावरचे भाव वाचले हि असतील. पण तिच्या बोलण्याने एकदम धीर आला. आपल्या सगळ्यांनाच असे अनुभव येत असतात. 'माझा विश्वास आहे तू हे करू शकशील' 'तू कर आम्ही तुझ्या पाठीशी आहोत' 'होऊन होऊन काय होणार आहे, आधी कर तर' अश्या वाक्यांनी, अश्या बोलण्यानी किती धीर मिळतो ना? एकदम दहा हत्तीचे बळ मिळते.

मी योगा टीचर ट्रिंनिंग करावं हि महेश आणि ऋचा दोघांची पण खूप इच्छा होती. माझे योगा वरचे प्रेम त्यांच्या हि नजरेतून चुकले नव्हते. तशी मी शाळेत असताना योगासने करायचे. शाळेत त्याची प्रात्येक्षिक करून दाखवायचे. पण मध्यंतरीच्या काळात योगा करणे पूर्णपणे थांबले. २०११ मध्ये डिना (माझी योगा गुरु) मुळे माझी योगाशी नव्याने ओळख झाली आणि योगा माझ्या जीवनाचा अतूट हिस्सा झाला. योगा करता करता त्याचे शात्रोक्त ट्रिंनिंग घ्यावे का असा विचार मनात डोकावू लागला. पण त्यासाठी लागणाऱ्या कंमिटमेन्टला मी तयार आहे असे मला वाटत नव्हते. दोनशे तास मला ह्या ट्रैनिंगसाठी द्यावे लागणार होते. दहा संपूर्ण शनिवार रविवार, त्या चार महिन्यातली प्रत्येक बुधवार संध्याकाळ शिवाय दररोज योगा क्लास, थेअरी अभ्यास... संपूर्ण चार महिने फक्त योगा.. त्यात ऋचाचे स्विम शेड्युल, तिच्या इतर ऍक्टिव्हिटी..  हे सगळे कसे मॅनेज होणार? पण महेश आणि ऋचा ने 'तू कर, सगळे व्यवस्थित होईल'.. 'आपण सगळे मिळून येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढू'  हा विश्वास दिला आणि मी हे शिवधनुष्य पेलायला तयार झाले.. आपल्यावर विश्वास दाखवणारी व्यक्ती सोबत असेल तर कोणताही विचार हा नुसता विचार रहात नाही. (मी ह्या विश्वासाचे काय केले हे येत्या चार महिन्यात कळेलच)... आज जरी हा विश्वास देणारे डिना, महेश, ऋचा असले तरी असा विश्वास देणारी व्यक्ती प्रसंगानुरूप बदलत असते.

काही गोष्टी आपण मैत्रिणींशी बोलतो, तर काही भावा बहिणींशी, तर काही आई बाबांशी!.. कोणती गोष्ट कोणाशी बोलावी हे आपल्याला पक्के माहिती असते. खूपदा  निर्णय झालेला असतो पण तो आपल्याला त्या व्यक्तीशी बोलताना पडताळून पाहायचे असते, त्या व्यक्तीच्या नजरेतून बरोबर आहे कि नाही जाणून घ्यायचे असते. खूपदा बोलता बोलताच प्रश्नाची उत्तरे मिळत जातात, गुंता सुटत जातो पण काही वेळा तो प्रश्न, तो गुंता सुटत नाही अश्यावेळी ते ऐकण्यासाठी, बोलण्यासाठी कोणीतरी आहे, ती व्यक्ती आपलायसाठी वेळ देते आहे हे खूप महत्वाचे वाटते... कधी तो विश्वास अगदी अनोळखी व्यक्तीकडून पण मिळतो. एखाद्या दुकानात जावे, एखादा ड्रेस आवडावा, तो आपल्याला चांगला दिसेल का म्हणून अंगाला लावून पाहावा आणि कोणीतरी चटकन 'it looks good on you' असे म्हणून जावे..

तसेच खूपदा आपले अंदाज चुकतात, घेतलेले निर्णय चुकीचे ठरतात, वाटते आता आयुष्यात काहीच राहिले नाही.. मग तेव्हा कुणीतरी हवं असतं आपल्याला सांगणारं, समजावणारं, कि "सर्व काही ठीक होईल." जेव्हा आजू बाजूला फक्त क्रिटिसाईझ करणारेच दिसतात तेव्हा आपल्या चुका पोटात घालून, आपल्याला साथ देणारे कोणीतरी हवे असते..

फक्त सुखात किंवा दुःखात नाही तर नेहमीच आपलायला "असं कोणीतरी हवं असतं".... 

-मी मधुरा...
१२ सप्टेंबर २०१७

Tuesday, September 19, 2017

ब्लॅकआऊट...

काल रात्री KGW (न्युज चॅनेल) वर "Is Portland ready for another snow storm?" हा स्पेशल रिपोर्ट पहिला आणि गेल्या वर्षीच्या स्नो स्टॉर्मची आठवण झाली...
१९ सप्टेंबर २०१७

माझ्या डायरीतून...

केवढा बर्फ पडतो आहे पोर्टलॅंड मध्ये! नुसते वंडरलँड झाले आहे.. जणू बर्फाची दुलई पांघरली आहे. दोन तीन दिवस झाले घरातून बाहेर हि पडलो नाही. नाही म्हणायला एकदा दोनदा बर्फात खेळायला गेलो इतकेच! सूर्याचे दर्शन होऊन कित्तेक दिवस झाले.. हे स्टॉर्म किती दिवस चालणार आहे काय माहिती?

काल तर हद्दच झाली. दुपारच्या सुमारास चक्क लाईट गेली. हो हो अमेरिकेत लाईट गेली.. विश्वास बसत नाही ना? लाईट जाणे हे इतके कॉमन नसले तरी क्वचित कधी तरी १-२ सेकंडसाठी लाईट जाऊन लगेच परत येतात. पण ह्यावेळी कहर झाला. बर्फाच्या वादळामुळे ट्रान्सफॉर्मर वरच झाड पडले. सगळीकडे बर्फ असल्याने क्रू ला काम करणे ही जड जात होते. लाईट जाण्याचा इतक्या वर्षात अनुभव नसल्याने एकदम धांदल उडाली. सेल फोन्स, iPad बाकी इलेक्ट्रॉनिक वस्तू पूर्ण चार्ज करून ठेवायला हव्या होत्या. टॉर्च होती पण बॅटरीज नव्हत्या, मोठया मेणबत्या घरात नसल्याने बर्थडे कॅण्डल्स वर किती वेळ काढणार? एकूण काय अश्या आणीबाणीच्या परिस्थितीत राहण्यासाठी आम्ही सज्ज नव्हतो.

बाहेर उजेड आहे तोवर लाईटचा काही प्रॉब्लेम नव्हता पण हीटर बंद झाल्याने घर हळू हळू गार पडायला लागले. मग महेशने नामी युक्ती काढली.. movie पाहायला जायचे आणि येताना जेवण करून परत यायचे... तो पर्यंत नक्कीच लाईट येतील. प्लॅन तर छान होता पण गॅरेज मधून गाडी बाहेर काढणे हे हि मोठ्ठे चॅलेंज होते. गॅरेजचे दार काहीतरी जुगाड करून ओपन केले. चार पाच तासाने घरी परत आलो पण अजुनी नेबरहुडवर अंधाराचेच साम्राज्य होते. कसे तरी धडपडत घरी आलो. ऋचासाठी हे सगळे नवीनच होते. आमच्या नेबरहूड मध्ये लाईट्स नसले तरी बाकी नेबरहुड्स एकदम चकमकत होती. तिची आपली एकच भुणभुण ...  its not fair..

पण थोड्याच वेळात ह्या अंधाराला सरावलो. ऋचाने घरात सगळीकडे दिवाळीसारखे दिवे, मेणबत्त्या लावल्या. घर एकदम प्रकाशाने झळाळून निघाले. तिमिरातुनी तेजाकडे असे काहीसे.. खूप दिवसांनी आम्ही तिघांनी आरामात बसून गप्पा मारल्या.. बोर्ड गेम्स खेळलो.. ऋचा इतकी एक्ससिटेड होती कि तिने भारतात सगळ्यांना लाईट नसल्याचे facetime करून सांगितले... अशी अचानक कधीतरी लाईट जाण्यातही एक मजा येते.

आमच्याकडे लहानपणी काही ना काही कारणाने लाईट जायचेच. आठवड्यातून एकदा लाईटना हक्काची सुट्टी असायची..  बाकी वेळी कधी लोड शेडींग, तर कधी लाईटच्या खांब पडला तर कधी वायर तुटली तर कधी ट्रान्सफॉर्मर खराब झाला म्हणून. ऐन परीक्षेच्या वेळी लाईट गेले कि जास्त चीडचीड व्हायची. एरवी कधी अभ्यास असेल तर मेणबत्तीच्या उजेडात वाचताना लै भारी वाटायचे. बाकी वेळी मज्जाच असायची. सगळे शेजारीपाजारी एकत्र येऊन गप्पा मारायचो, अंधारात चांदण्याच्या किंवा लुकलुत्या मेणबत्तीच्या प्रकाशात एकत्र अंगात पंगत करून जेवायचो, भुता खेताच्या गोष्टी सांगायचो, मेणबत्तीच्या उजेडात भीतीवर सावल्यांचे खेळ खेळायचो,  आकाश निरभ्र असेल तर तारे ओळखायचो.. अश्यावेळी लवकर लाईट आली तर वाईट वाटायचे कारण लाईट नसताना टाईमटेबल पाळावे लागायचे नाही. लाईट येईपर्यंत कसलीही घाई नसायची.

हे सर्व सांगायचं कारण म्हणजे आता हे सगळं अनुभवायला मिळत नाही. कालच्या ब्लॅकआउट मुळे ह्या आठवणींना उजाळा मिळाला. खरंच 'लाईट जाणे' यातली मजा खूप वेळा घेतली आहे आणि त्याचा त्रासही सहन केला आहे . पण त्यातले अनुभव आणि आठवणी या नेहमीच आनंददायक आहेत.

-मी मधुरा...
१० डिसेम्बर २०१६

Sunday, September 10, 2017

गणपती बाप्पा मोssरया...

बऱ्याच वर्षांनी आम्ही सगळे कुटुंबीय गणपतीसाठी भारतात जमलो होतो. खूप धम्माल केली. रात्र रात्र जागून केलेली सजावट, त्यासाठी केलेले एकत्र शॉपिंग, लेट नाईट केलेल्या स्टारबक्स च्या वाऱ्या.. घरातील, बिल्डिंग मधील तो सळसळता उत्साह.. सगळे कसे एनर्जेटिक होते. 

पण हे सगळे करत असताना एक लक्षात आले कि सण साजरे करण्याची पद्धत दिवसेंदिवस खूप बदलत चालली आहे. श्रद्धेपेक्षा, भावनेपेक्षा लोक दिखावा करण्यावर जास्त जोर देतात. किती पैसा खर्च केला ह्यावर भक्ती ठरवली जाते. हौसेला मोल नाही हे कितीही खरे असले तरी ती हौस भागवायला पैसा तर लागतोच ना? पुण्यातील लक्ष्मी रोड, तुळशीबाग, रविवार पेठ असो वा उपनगरातील दुकाने सगळी तुडुंब भरून वाहत होती. लोकांचे एकच टार्गेट आहे फक्त शॉपिंग असे काहीसे चित्र दिसत होते. एक एक गोष्टींच्या किमती पाहून माझ डोकं चक्रावत होत... कदाचित हे माझ्यासाठी नवीन असेल म्हणून हि असेल. कळताच नव्हते कि लोकांकडे पैसा जास्ती झाला आहे कि रुपयाची किंमत कमी झाली आहे. कोठे आहे महागाई? कोठे आहे गरिबी? पहिल्या दिवशी खरेदीला गेलेली मी भांबावून घरी परत आले. हे फक्त गणपतीतच असते असे नाही तर प्रत्येक सण असाच साजरा केला जातो हे ऐकून मला भोवळ यायचीच बाकी होती. वयक्तिक गणपतीसाठी लोक इतका खर्च करतात तर सार्वजनिक गणपतीचे तर विचारायलाच नको. 

लाखो रुपयांचे भव्य मंडप आणि त्यांची रोषणाई.. मान वर करून बघायला लागेल इतकी भव्य श्रींची मूर्ती.. प्रसाद आणि नैवेद्याची रेलचेल.. सिने तारे-तारकांचा झगमगाट..  समाज सुधारणेचे (?) अनेक कार्यक्रम.. डॉल्बी लावून केलेले चित्र-विचित्र नाच आणि या सगळ्यातून ओथंबणारा भक्तीरस.. मोठमोठठाली पोलिटिकल, कमर्शिअल होल्डिंग्स.. अपार्टमेंट सोसायट्या सुद्धा यात मागे नाही बर का.. 

आमच्या वेळी गणेश उत्सव कसा होता आणि आत्ता कसा आहे, काय चांगले, काय वाईट ह्यावर मला चर्चा करायची नाही. मुलांसाठी, समाजासाठी चांगले वाईट काय हे जो तो जाणतो. पण जेव्हा अश्या सणांमध्ये जातीयवाद, समाजवाद येतो तेव्हा मात्र त्रास होतो. गणेश उत्सव कोणी सुरु केला? तो कोणत्या जातीचा होता? कोणाचे नाव गणेश उत्सवाला द्यावे? असे प्रश्न १२५ वर्षानंतर का उभे राहतात? आपण कोठे तरी चुकतो आहोत का? जेव्हा टिळकांनी गणपतीला घरातून बाहेर आणून चौकात बसवून पूजा केली तेव्हा त्यांच्या मनात समाज एकीकरण ह्या शिवाय दुसरे काहीच नव्हते. हे सगळे पहिले कि वाटते टिळकांनी घरातील गणपती बाहेर आणून चूक तर केली नाही ना? कदाचित ह्या प्रथेमागची मूल्ये ही मधल्या काळात गणपती बरोबरच विसर्जन पावली असावीत. 

मी किती ही जरी टीकेचा सूर लावला असला तरी अजुनी सगळे संपलेले नाही. जो पर्यंत लेझीम-ढोल ताशांवर नाचणारी पावले आहेत, टाळ्यांच्या गजरात आरतीचा दुमदुमणारा आवाज आहे, 'हरे राम- हरे राम' म्हणताना शरीरातूनही येणारी कंपनं आहेत, विसर्जना नंतर येणारी उदासी आहे.. तोवर आपण हरलेलो नाही.  आपल्या मनातील गणेश अजुनी जीवंत आहे आणि तो आपल्याला हरू देणार नाही. 

बाकी श्रींची इच्छा...

-मी मधुरा...
१० सप्टेंबर २०१७

Friday, September 8, 2017

पारंब्या

प्रिय आजीस,

नुकतीच मी गारवड्याला, तुझ्या माहेरी म्हणजेच माझ्या पणजोळी जाऊन आले. त्याचे असे झाले कोयनानगर ला आम्ही सगळे मावस बहीण भावंडे जमलो होतो. कऱ्हाड पासून पाटण फाट्याला आमची गाडी लागली आणि मन एकदम गारवड्यात पोचले. आणि तुझी प्रकर्षाने आठवण आली. तुझ्या प्रेमाची उब परत अनुभवण्यासाठी त्यावेळीच ठरवले की परतताना गारवड्याला नक्कीच जायचे. तुझ्या बरोबर जगलेले ते क्षण परत जगायचे. पेरूच्या बागेत, आमराईत, गणपतीच्या देवळात, बहुलेश्वराच्या देवळात पाय तुटेपर्यंत भटकायचे.. पारंब्या खेळायच्या, ओढ्यात पाय सोडून मनसोक्त गप्पा मारायच्या. ह्या प्लॅन मध्ये बाबा आणि मनीषला पण सामील करून घेतले. आम्ही सगळेच खूप एक्सायटेड होतो... बाबा त्यांच्या आजोळी जाणार म्हणून आणि आम्ही ते समक्ष अनुभवणार म्हणून! संपूर्ण प्रवासात फक्त जुन्या आठवणी परत परत चघळत होतो. तू , मामा आजोबा, मामी आजी, मावशी आजी सगळ्यांना परत परत भेटत होतो. जस जसे गारवडे जवळ येत होते आम्ही ओळखीच्या खाणाखुणा शोधायला लागलो. पण एक ही ओळखीची खूण सापडेना. खूप बदल आहे ग आपले गारवडे..

एका टुमदार खेड्याचे/गावाचे स्वप्न मनात घेऊन मी गारवड्यात यायचे ठरवले. गाडी गणपतीच्या देवळासमोर उभी राहिली आणि माझी तंद्री भंग पावली. माझा विश्वासच बसेना कि आम्ही गावात आलो आहोत. गणपतीच्या देवळापेक्षा ओढा आणि त्यावरचा पूल हे जास्ती जवळचे असल्याने पटकन पावले तिकडे वळाली. पण जे समोर पाहिले त्यावर विश्वासच बसेना. आजी, आता गावात यायला ओढ्यावरचा पूल लागत नाही. पूर्वी सारखा ओढा ही नाही आता. ओढ्याचा शोध घेत घेत आम्ही बहुलेश्वराच्या देवाळापर्यंत जाऊन पोचलो.. तेथे नाही म्हणायला चार पाच झरे दिसले आणि हायसे वाटले. निदान झरे तरी शिल्लक आहेत. आपण बहुलेश्वराला जाताना झऱ्याच्या पाण्यातून चालत जायचो पण आता तेथे मोठ्ठी भिंत बांधली आहे आणि देवळाचे प्रवेशद्वार ही बदलले आहे. वाडाची झाडे अजुनी आपली साक्ष सांगत उभी आहेत. आठवते, त्याच्या पारंब्या खेळत आम्ही ओढ्याच्या पाण्यात उड्या मारायचो. ओढा भरून तेथे आता रस्ता झाला आहे. ओढ्याच्या आठवणी आता मनातल्या कोपऱ्यात जपून ठेवायच्या बस्स.

आपल्या खाजगी गणपतीच्या देवळाचा जिर्णोद्धार झाला पण खुद्द स्वारी एका वेळच्या पूजेला महाग झाली आहे. देऊळ खूपच प्रशस्त आणि हवेशीर बांधून झाले आहे पण देवळाबाहेर तण, कचरा यांचे साम्राज्य झाले आहे. पाहायला आपल्यापैकी तेथे कोणीच नाही. गावातली लोक वाट पाहत आहेत कि कोणी तरी याची जबाबदारी घेईल आणि स्वच्छ सुंदर देऊळ गावाला मिळेल. गावात अजुनी जोशी सावकारांच्या आठवणी सांगणारे लोक आहेत पण थोडेच दिवसात ते ही काळाच्या पडद्याआड जातील. मग काय होणार? नोकरी धंद्या निमित्य सगळे बाहेर पडले, पडायलाच पाहिजे पण आपली मुळे विसरून कसे चालेल?

गुरवाला बोलावयाच्या निमित्याने गावातून फेरफटका मारला. गाव खूपच सुधारले आहे. घरोघरी डिश टीव्ही, मोबाईल, गाड्या, पक्की घरे.. काय नाही आहे तिथे.. गावाचा पूर्वीचा चेहरा मोहराच बदलला आहे. आपला वाडा ह्या सगळ्यात जुन्या आठवणी एकवटून कसा तरी उभा आहे. एका काळाची शान सांगणारा आता मूकपणे आपले अस्तित्व सांगत आहे. घर बंद असल्याने आत जाता आले नाही. तो चौसोपी वाडा, वाड्यामागे परस, परसामागे आमराई काय थाट होता.. निवृत्ती मास्तरांच्या बागेतील पेरूची चव अजुनी जिभेवर आहे.

गावातून जाताना जाणवले लग्न होऊन तू सुभेदारवाडी ला आलीस त्यावेळी तुला काय वाटले असेल? दोन्ही गावाच्या ठेवणीत तसा फारसा फरक नाही, घाटावरच्या गावातून कृष्णा काठच्या गावात आणि सावकाराच्या घरातून सरदार घराण्यात हाच काय तो बदल.. वयाच्या दहाव्या वर्षी कसे मॅनेज केले असशील? तुझ्या मनात काय विचार असतील? तेव्हा फारशी माहेरी जायची पद्धत ही नव्हती. आपले गाव, जिथे आपण खेळलो, बाघडलो, आपलं घर आता ते तुटणार हे सुद्धा कळायचं तुझं वय नव्हतं. आई काकू जेव्हा माहेरी जात असतील तेव्हा तुला ही वाटले असेल ना गारवड्याला जावे. आपण सगळे पहिल्यांदा गारवाड्याला गेलो तेव्हा 'माहेरच्या माणसांसारखेच गावाशी पण एक अतूट नाते असते' हे मी तुझ्या डोळ्यात पाहिले.. आणि माझी ह्या गावाशी कायमची गट्टी झाली. बाबा, काका,आत्या फारसे आजोळी गेलेच नाहीत. पण त्यांच्या मनात ही आजोळ बद्दल हळवा कप्पा आहे.

बदल ही काळाची गरज आहे. आपण कितीही बदललो तरी आपली मुळे विसरू शकत नाही. तुला हे आत्ता सांगायचे कारण म्हणजे मी जेव्हा अनेक देशात-गावात फिरते तेव्हा मनात खात्री असतेच कि आपली मुळे अजुनी गावात आहेत, जिथं आपण वाढलो. पण त्या गावातले बदल पाहताना, लोकांच्या अनोळखी नजरेला तोंड देताना किंवा जुन्या लोकांची ओळख पटायला वेळ लागतो, तेव्हा वाटते, आपण सगळे विसरत तर चाललो नाही ना? त्याचवेळी ओळखीच्या जागा, लोक, चालीरीती पाहून आपण ही त्याच गावाचे आहोत ही खात्री पटते आणि आधार ही वाटतो.

गावातून निघताना परत ती वडाची झाडे दिसली अनेक पारंब्याने बहरलेली.. अश्याच पारंब्या सारखे आम्हीही बहरत विस्तारत आहोत. आपण कितीही दूर गेलो तरी मुळे तिथेच असतात.. जस या पारंब्याच एक मूळ तू आहेस, एक मूळ मी ही आहे आणि एखाद मूळ ऋचा ही आहे. जस हे गारवडे माझ्या मनात घर करून आहे तसेच एखादे गारवडे ऋचाच्या मनात पण वसेल. हा माझा विश्वास आहे.

तुझी
मधु
७ सप्टेंबर २०१७




घडी रे घडी...

भारतातून घरी आल्या आल्या एक लॉंड्री बास्केट भरून कपडे माझी घडी घालण्यासाठी वाट पाहत होते तर काही घडी घातलेले कपडे इस्त्री करायची वाट पहात होते. भारतातील आरामदायक सुट्टी नंतर हे काम नक्कीच कंटाळवाणे होते. इतरवेळी सुट्टीहून आल्यानंतर सर्व प्रथम बॅगा उघडून मळलेले कपडे घुवून, घडी करून जगाच्या जागी जातात आणि बॅगा स्टोअर रूम मध्ये! त्याशिवाय मला झोप येत नाही की अन्न गोड लागत नाही. ह्याला अपवाद मात्र इंडिया ट्रीपचा असतो. बॅगा उघडल्या की छान इस्त्री केलेले कपडे कपाटात विसावण्यासाठी सज्ज असतात. ते एक सारखे घडी केलेले कपडे पाहिले की इस्त्रीवल्या काकांबद्दल उर अभिमानाने भरून वैगरे येतो. समाजातील ७० ते ८० टक्के लोकांना परीटघडीचे कपडे देऊन सभ्य बनवण्याचे काम हे काका लोक करतात. दुपट्टा पासून ते साडी पर्यंत, बुशशर्ट पासून ते सूट पर्यंत, धोतरा पासून ते पँट पर्यंत, कुर्ती पासून ते अनारकली पर्यंत हे 'घडी मास्तर' सगळे काम कसे लिलया पार पाडतात. कपड्याची दोन टोके एकत्र करून कपड्याचा मध्य काढणे, शर्टच्या चौकोनाचे तीन समान भाग करणे, अनारकली सारख्या आकारमानाने जाडजुड असणार्या कपड्याला समद्वीभुज त्रिकोणात घडी करून त्याचे मोठ्या चौकोनातून छोट्या चौकोनात रूपांतर करणे हे केवळ भुमिती तज्ञच करू शकतो. मला हा 'घडी मास्तर' चा कोर्स कोठे असेल तर नक्की करायला आवडेल.

तशी आपली ह्या घडीशी ओळख अगदी लहानपणापासुन होते. बालवाडीत जाताना त्रिकोणी घडी घातलेल्या रूमाला पासून चा हा प्रवास आयुष्याच्या प्रत्येक टप्यात वेगवेगळ्या घडीशी ओळख करत सुरूच असतो. नविन पुस्तकांना खाकी रंगाची कव्हर घालताना केलेल्या घड्या, हस्तकला वर्गात केलेल्या ओरोगामीच्या क्लिष्ठ घड्या, वही मधील पानांच्या घड्या, साखर झोपेतून कसेतरी डोळे चोळत उठल्यावर केलेली पांघरूणाची घडी, आईला लाडीगोडी लावायच्या वेळी केलेली साडीची घडी, सुट्टीत दुपारी सगळ्या भावंडांनी मिळून केलेल्या रोजच्या कपड्यांच्या घड्या, पोळीच्या घड्या, आता मोठ्ठी झालीस असे करू नकोस म्हणताना पडणार्या आईच्या कपाळावरील घड्या, कपड्यांच्या घड्या आणि त्यावरून घरोघरी होणारी छोटीमोठी भांडणे, जिम मध्ये पोटावरील घड्या (वळ्या) उतरवताना होणारी दमछाक आणि आयुष्याची घडी बसवताना अश्या केलेल्या आणि कराव्या लागणार्या असंख्य घड्या... 

कपड्यांची घडी घालणे ही एक कला आहे. माधवाच्या चौचष्ट कला मध्ये याचा समावेश आहे का नाही माहिती नाही पण असायला हवा. साडीच्या दुकानात, तयार कपड्यांच्या दुकानात घड्या घालणारी ही खास माणसे दिवसभर घड्या करून आपल्या संसाराची घडी बसवतात. जेव्हा ह्या कपड्यांच्या घड्या मोडायची वेळ येते ना मग त्या इस्त्रीवाल्या काकांनी केलेल्या घड्या असोत किंवा नवीन कपड्यांच्या, अंगात एकदम स्फुरण येते.. अश्या कपड्यात मिरवण्याचे समाधान काही औरच असते. 

बायकांसाठी 'घडी मोडणे' हा एक सोहळाच असतो. चांगला दिवस पाहून नवीन कपड्यांची, साडीची घडी मोडली जाते. जेव्हा मैत्रिणी, सासू सुना एकमेकींच्या साड्यांच्या घड्या मोडतात तेव्हा त्यांच्यातील प्रेम नक्कीच वाढत असेल. 

अनंत घडीचे डाव... त्याला जीवन ऐसे नाव.... हेच खरे!

-मी मधुरा...

अशी मी तशी मी..

३२ तासाच्या प्रवासानंतर कधी एकदा घरी पोचते असे झाले होते. पोर्टलंड ला लँड झाल्यावर झालेला आनंद घर पाहिल्यावर आणखी कितीतरी पटीने दुणावला. प्रवासाचा क्षीण कुठल्या कुठे पळाला. काय जादू आहे ना 'घरात'!? माहेरचे घर, सासरचे घर आणि माझे स्वतःचे घर.. तिन्ही घरे माझीच, पण प्रत्येक घरात असणारी 'मी' वेगळी.. आईच्या घरून भरल्या डोळ्यांनी आणि जड मनानी निघणारी 'मी', सासरी घरी गेल्यावर एकदम बदलून जाते. आईच्या घरातील मायेचा ओलावा जपणारी 'मी' आणि सासरच्या घरातील जबाबदारीची जाणीव असणारी तीच 'मी' त्यातली खरी 'मी' कोण? असा प्रश्न पडावा इतकी.. ह्या दोन्हीत असणारी तीच 'मी' पण किती वेगळ्या.. आणि ह्या दोन्ही 'मी' पेक्षा अमेरिकेतील 'मी' अजूनी ही वेगळी...

वर्षभर भारतवारीचे चे वेध लागणारी 'मी' आणि तिकडे गेल्यावर दोन तीन आठवड्यातच पोर्टलंड ला मिस करणारी 'मी' ह्यातील खरी 'मी' कोण? 

इकडे अमेरिकेत जीन्स, शॉर्ट्स, मिडी मध्ये वावरणारी 'मी' आणि भारतात गेल्यावर चुडीदार सूट आणि साडी मध्ये असणारी 'मी' ह्यातील खरी 'मी' कोण?

नातेवाईक, मित्र मैत्रिणीं मध्ये रमणारी 'मी' खरी का आईच्या मांडीवर जगाला विसरून विसावलेली 'मी' खरी?

मुलीच्या, सुनेच्या, बायकोच्या, बहिणीच्या नात्यात गुंतलेली 'मी' आणि कधी कधी अलिप्त स्वताःला शोधणारी 'मी', ह्यातील खरी 'मी' कोण?

भारतातल्या लहानश्या गावात वाढलेली, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानणारी 'मी' खरी का अमेरिकेतल्या शहरात राहून मोठ्ठी मोठ्ठी स्वप्ने साकारण्यासाठी धडपडणारी 'मी' खरी?

भारतात गेल्यावर तिकडच्या संस्कृतीत स्वतःला फिट बसवण्याचा प्रयत्न करणारी 'मी' खरी की इकडे अमेरिकेत आल्यावर स्वतःमध्ये भारतीयत्व शोधणारी 'मी' खरी?

लोकांच्या मनामध्ये असणारी मी 'खरी' का माझ्या मनामध्ये असणारी 'मी' खरी? 

ह्या सगळ्या 'मी' एकमेकात इतक्या सहजतेने गुंफाल्या आहेत  कि आता खरी 'मी' कोण हेच कळत नाही. कदाचित अशी गुंफलेली 'मी'च खरी 'मी' असेन.. 

-मी मधुरा..
३ सप्टेंबर २०१७

माझे साडी प्रेम!!!

काल जेष्ठा कनिष्ठांचे आगमन झाले.. त्यांना सजवण्यात, अरास करण्यात कालचा दिवस कसा गेला तेच कळले नाही.. ह्यावेळी प्रथमच गौरींसाठी इंडीयात असल्यामुळे ऋचा, माझी लेक, खूप उत्साहाने सगळ्यात सहभागी होती. गौरींचे मुखवटे बॉक्स मधून काढण्यापासून ते साड्यांचे स्टॅन्ड लावण्यापर्यंत सगळे कौतुकाने पाहत होती. गौरींना साडी नेसवत असताना सतत प्रश्न विचारणे सुरू होते.. एकदमच तिचे डोळे चमकले आणि म्हणाली, आई तू पाहिल्यांदा कधी साडी नेसलीस? तुला पण आजी अशीच साडी नेसवायची का?

मला आठवत नाही कि मी पहिल्यांदा कधी साडी नेसले. मला माझी कमल साडी (शिवलेली साडी) मात्र आठवते.. भातुकली खेळताना नेहमी मी साडी नेसून खेळायचे असे आई सांगते.. मग साडी म्हणून काहीही चालायचे.. आईची साडी, धोतराचे पान, अगदी उपरणे सुद्धा!! थोडे फार फोटो सोडले तर माझ्या आठवणीत असे फारसे काही नाही. मला जसे आठवते त्याप्रमाणे मला साडी फारशी कधी आवडलीच नाही.. साडी नेहमी बोजड आणि कंटाळवाणा प्रकार वाटायचा. कामे करताना त्या वर खोचलेल्या निऱ्या, कंबरेभोवती बांधलेला पदर, त्यातून दिसणारे ते पोट.. यक फीलिंग यायचे.. त्या ओंगळवाण्या चित्रात मी स्वतःला इमॅजिन करू शकायचे नाही.. एक साडी नेसण्यासाठी त्याचा मॅचिंगचा ब्लॉउज, मॅचिंग पेटीकोट इतका प्रयास का करायचा? त्यापेक्षा सुटसुटीत पंजाबी सूट्स का नाही वापरत? 

माझे हे साडी न आवडणे इतके टोकाचे होते कि आठवी नववीत असताना माझ्या मावस भावंडांबरोबर 'मी माझ्या लग्नात जीन्स घालून बोहल्यावर चढेन' असे लेखी कॉन्ट्रॅक्ट केले होते.. लग्नाळू मुलगी म्हणून मुलाकडच्यांना भेटायला जाताना तरी मी साडी नेसेन का ही चिंता आई काकू ला होती.. कॉलेज मधील साडी डे च्या दिवशी मी चक्क कॉलेज चुकवून घरी थांबायचे. याला अपवाद मात्र नऊवारी साडीचा होता.. आजीच्या मऊ मुलायम नऊवारी साडीचे नेहमीच कौतुक वाटायचे. ती नेसून आजीची नथ घालायला मिळणे ही अपूर्वाई होती.. स्वतःची अशी पहिली साडी घेतली ती आत्येभावाच्या लग्नात! अगदी नाईलाजाने... (हम आपके हैं कौन मधली जांभळी साडी, अगदी सेम टू सेम)... माझ्या लग्नाच्या वेळी  माझ्याकडे मोजून ७ साड्या होत्या.. लग्नात द्यायच्या पाच साड्या, आत्येभावाच्या लग्नातली साडी आणि वाढदिवसाला सासूबाईंनी दिलेली साडी.. माझ्या लग्नातील साडी खरेदी मी अर्धा तासात आवरली होती.. पिवळ्या आणि हिरव्या रंगाची साडी मस्ट असते म्हणून ते रंग, मरून रंग आवडतो म्हणून त्या रंगाचा शालू.. आता कोणते रंग उरले, चला ते घेऊन टाकू... झाले शॉपिंग.. आहे काय अन नाही काय? लग्नाच्या खरेदीचा इतका बाऊ का केला जातो तेच कळत नाही.. 

सासरी आल्यावर, मी सासूबाईंना साडी नेसताना पाहायचे.. घरी नेसायची साडी असो किंवा बाहेर जाण्याची त्या खूप कलात्मकतेने साडी नेसायच्या.. प्रत्येक निरी एक सारखी असायची! पदराला पिन न लावता चापून चोपून पदर घेतलेला असायचा. त्यांचे साड्यांवर प्रेम करणे, साड्यांची काळजी घेणे हे पाहता पाहता मला कधी साडी बद्दल आपुलकी वाटू लागली कळलेच नाही. प्रत्येक साडी मागे त्यांची एक आठवण असायची आणि ती त्या खूप अभिमानाने शेअर करायाच्या.. त्यांचे ते भारावून बोलणे मला आवडायचे.. ही साडी पहिल्या पगारातून, ही लग्नातली, ही भिशीतून, ही मुलांच्या डोहाळे जेवणाची, ही मुलांच्या मुंजीतली.. वाटायचे ह्या साड्यां पण किती नशीबवान आहेत की त्यांना इतकी काळजी घेणारी मालकीण मिळाली आहे.. वाटायचे त्या साड्यांनी पण ते क्षण एन्जॉय केले असतील... 'मी ना सोडमुंजीच्या वेळी महेशच्या मुंजीतील साडी नेसले होते' हे सांगताना त्याच्या डोळ्यातील ते भाव मी कधीच विसरू शकत नाही. अश्या आठवणीं साठी तरी मी साडी नेसली पाहिजे असे मला वाटू लागले. साडी कशी पाहायची, त्याचा पोत कसा पाहायचा पासून ते साडी कशी नेसायची हे मी त्यांच्या कडून शिकले. 'साडी हेटर ते साडी लव्हर' हे ट्रानझिशन केवळ त्यांच्यामुळेच होऊ शकले. 

माझी जाऊ साड्यांचा बिझनेस (silk and cotton treads ) करते. तिच्यामुळे साऊथच्या साड्यांची ओळख झाली. तिथल्या सिल्क च्या तर मी प्रेमातच आहे. कांजीवरम, नारायणपेठ, गढवाल, पैठणी, संबळपूर, कूर्तकोटा, उफाडा अश्या नाना प्रकारच्या विविध रंगसंगतीच्या साड्या बघून मन हरकून जाते. नवीन आलेल्या साड्यांचा लॉट पाहणे हा एक अनुभवच आहे..  घरातील सगळेच सासूबाई, नणंद, जाऊ 'साडी गुरु' आहेत. त्यामुळे जेव्हा आम्ही सगळे भेटतो तेव्हा जेवताना, खाताना, पिताना साड्यांबद्दल, नवीन ट्रेंड्स, नवीन फॅशन बद्दल चर्चा रंगतात.. 

आज माझ्याकडे साड्यांचे माझे असे खास कलेक्शन आहे.. फॅन्सी साड्यांपेक्षा माला ट्रॅडिशनल काठापदराच्या सिल्कच्या साड्या खुप आवडतात.. प्रत्येक इंडिया ट्रिपला मी एक तरी साडी घेतेच.. साड्यांची खूप काळजी ही घेते.. वेळ मिळेल तेव्हा साड्याना बाहेर काढून त्यांना हवा देते, त्यांच्या वरून प्रेमाचा हात फिरवते.. ऋचा सुद्धा ह्यात आनंदाने सहभागी होते.. आई तू ही साडी कधी घेतलीस? असे जेव्हा ती विचारते तेव्हा माझे ही डोळे कदाचित आनंदाने लुकलुकत असतील कारण माझ्याकडे पण सांगण्यासारखे बरेच काही असते..   

कोणत्याही भारतीय स्त्रीचे सौंदर्य साडीतच जास्ती खुलून दिसते असे माझे ठाम मत आहे.. मग ती स्त्री जाड असो वा बारीक, उंच असो वा ठेंगणी, काळी असो वा गोरी, साडी साधी असो वा भारी, ट्रॅडिशनल असो वा फॅन्सी.. फक्त एकच अट... साडी व्यवस्थित नेसली गेली पाहिजे.. 

-मी मधुरा..
३० ऑगष्ट २०१७



खजिना आठवणींचा!!!

आईकडे आले कि माझे आवडते काम म्हणजे माझे सामान असलेले जुने कपाट आवरणे म्हणजे पुन्हा नव्याने लावणे... जुने फोटो, अल्बम काढून कित्त्येक तास पाहत राहणे.. मला ह्या फोटोत पण एक मायेची उब जाणवते. कघी कधी मध्येच सोडून गेलेली माणसे नव्याने सापडतात तर कधी लहानपणीच्या मैत्रिणी आठवणींचा फेर धरतात. आजीच्या साडीची गोधडी, काही ड्रेसेसच्या ओढण्या अजुनी माझ्या कपाटात आहेत. ह्या कपड्यांना आठवणींचा एक मंद सुगंध असतो, बकुळी सारखा.. जितका जुना तितका गडद ... माहेरी आल्यावर मी घड्याळाला सुट्टी देऊन टाकते.. 

काय सापडत नाही ह्या कपाटात? कॉलेज मध्ये लिहिलेले मेमो बुक,वही जिच्या मागच्या पानावर मैत्रिणी बरोबर खेळलेले गेम्स, अकाउंटिंग बुक मधले मोराचे पीस, चंद्रशेखर गोखलेंचे 'मी माझा', मैत्रीणीं बरोबर पाहिलेल्या पिक्चरची तिकिटे, गिफ्ट रॅपर्स, अगदी टिकल्यांचे पाकीट सुद्धा... जशी अलिबाबाची गुहाच!! 

फोटो पाहणे हा माझा जिव्हाळ्याचा विषय.. कोणी काहीही म्हणो फोटोच्या जादुई दुनियेत रमणे मला आवडते.. आई बाबांबरोबर फोटो पाहताना त्यांच्या आठवणी ऐकणे, त्यांच्या चेहर्या वरच्या भावना टिपणे मला आवडते.. आजी आजोबा, काका काकू, आत्या, सगळी भावंडे ह्यांच्या बरोबर परत ते दिवस जगायला मला आवडते... फोटो पाहताना त्यावेळी घडलेले किस्से परत परत आठवायला मला आवडते.. शाळेतले, कॉलेज मधले फोटो पाहताना मैत्रिणी परत भेटतात आणि भेटताच राहतात.. 'गेले ते दिन गेले' असे म्हणण्या ऐवजी आपल्यातच ते दिन शोधायला मला आवडते.. लेकी बरोबर, मागे राहिलेले माझे बालपण परत जगायला मला आवडते.. आणि प्रत्येक वर्षी नव्याने स्वतःला शोधायला मला आवडते!!

आठवणींचा हा कधीही न संपणारा खजीना माझ्या एका कपाटात सामावला आहे.. दरवेळी मी ह्यातून आठवणींची शिदोरी बरोबर नेते आणि काही आठवणी ह्यात साठवून ठेवते नंतर नेण्यासाठी... 

-मी मधुरा..
१८ ऑगष्ट २०१७

आतुरता तुझ्या आगमनाची...

एका तापानंतर तुझी माझी अशी प्रत्यक्ष भेट होणार आहे. ह्या भेटीची मी कितीतरी स्वप्ने पहिली आहेत, त्यासाठी माझी जोरदार तयारी ही सुरू आहे. इतकी वर्षे झाली पण आपले नाते आहे तसेच आहे.. वर्षागणिक अधिकच दाट होते आहे.. तुझ्या वरचा विश्वास तूसभर ही कमी झाला नाही आहे.. तुझे दरवर्षी होणारे ओझरते दर्शन उर्वरित वर्षासाठी खूप काही देऊन जाते.. 

कित्तेक तास आपल्यात झालेला मूक संवाद, तुझे ते शांत प्रसन्न हसणे, तुझे आश्वासक पाहणे सगळं सगळं आज आठवते आहे.. सोंडेतून ही तू कसा प्रसन्न हसू शकतोस हे मला अजूनही कळाले नाही आहे. त्या हसण्याच्या प्रेमात मी परत परत पडत राहते. 

मला आठवते, दरवर्षी आम्ही एकाच प्रकारची, एकाच रंगसंगतीची तुझी मूर्ती आणायचो. त्यामुळे दरवर्षी तू मला त्याच रूपात दिसायचास. माझं तुझ्यावरचं प्रेम त्या मूर्तीत शतपटीने दुणावत जायचे. माझ्या दृष्टीने, तुझी मूर्ती ही काही चॉइस करण्याची गोष्ट असू शकत नाही, त्यात तुझे असणे हे महत्वाचे! अजुनी ही मी तुला त्याच रूपात प्रत्येक मूर्तीत पाहते.    

दीड दिवसाच्या तुझ्या ह्या सोहळ्याची तयारी आधीपासून सुरु व्हायची. देवघराची साफसफाई रंगरंगोटी चातुर्मास सुरु होण्याआधी झालेली असायची. झाडावरचे नारळ उतरवण्यापासून ते तांदुळाची पिठी करण्यापर्यंत सगळे आजीच्या देखरेखीखाली सुरु असायचे. घरचे वातावरण मोरयामय होऊन जायचे. घरातील प्रत्येक सदस्याचा हातभार लागायचा. प्रत्येकाने एक तरी दुर्वांची जुडी निवडून तयार करावी असा आजीचा आग्रह असायचा. 

तुझे आगमन अगदी शाही थाटात व्हायचे. मोठ्या ऐटीत अप्पूच्या (ज्याच्या अंगाखांद्यावर खेळून माझे आबा मोठ्ठे झाले तो, घरातील एक वयस्क सदस्य) हातातील ताम्हणात विसाऊन टाळ आणि मोरयाच्या गजरात मिरवत मिरवत यायचास. डौलदार फेटा बांधून तुझ्या सेवेसाठी तत्पर असलेला अप्पू आणि त्याच्या हातात मोठ्ठ्या विश्वासाने विराजलेला तू! दोघेही नेमस्त!! आजी, आई, काकू यांच्या कडून तुकडा-पाण्याची ओवाळणी स्वीकारून तू स्थानापन्न व्हायचास.  तुझे वक्राकार कानातील सोनेरी डूल, खांद्यावरचा मऊशार रेशमी शेला, छातीवर रुळणारी कंठी, बाजूबंद, लंबोदर आवरायला कसलेले पितांबर, पायातील तोडे हे पाहाताना मन मोहुन जायचे.

तुझ्या पूजेसाठी तयार केलेल्या ताटातील गर्द जास्वंदीचं फुल, केवडा, पत्री, दुर्वांची जुडी, शमीपत्र, धुपकांडी, चंदन, मोगरा, गुलाब, केवडा नाना प्रकारच्या अगरबत्या, धूप-कापुराचा दरवळणारा सुगंध, बाजूला शांतपणे तेवणारी समई, तुपाचा दिवा, मंत्रमुग्ध करणारी आरती हे सारे परत अनुभवायचे आहे.. त्यात हरवून जायचे आहे.. 

वाट पाहतेय तुझी... ये लवकर...

-मी मधुरा..
१२ ऑगष्ट २०१७





मनोगत

स्वतःचा ब्लॉग असावा जिथे मी लिखाणातून व्यक्त होईन ही माझी खूप दिवसाची इच्छा आज पूर्ण होते आहे. मध्यंतरीच्या काळात मी लिहिण्याचा प्रयत्न केला.. डायरीतच काही तरी लिहीत राहिले.. काही लिखाण पूर्ण झाले.. काही तसेच अर्धवट कागदावर राहिले.. काही विचार मनात विरून गेले.. 

चाळीसाव्या वाढदिवसाला मी स्वतःलाच एक पत्र लिहिले होते.. चाळीस ह्या माईल स्टोन वरून आयुष्याकडे पाहताना, स्वतःकडे पाहताना, स्वतःचे, आयुष्याचे एक चित्र रंगवायचा छोटासा प्रयत्न पत्र रूपातून केला होता.. स्वतःसाठी काय करायला आवडेल हे लिहिले होते.. काळानुरूप ह्या चित्रातील रंग बदलत जातील.. काही हलके होतील, काही गडद.. काही नव्याने आकार घेतील.. हीच तर मजा आहे ना?? ह्यात कोठे ही "should" नाही.. तेच पत्र पहिली ब्लॉगपोस्ट म्हणून टाकते आहे.. 

-मी मधुरा...
८ सप्टेंबर २०१७

प्रिय मला,

Happy Birthday!! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!! 

आज सकाळी आरशासमोर उभे राहून, मी मलाच शुभेच्छा दिल्या.. कसले भारी वाटले स्वतःच्याच डोळ्यात डोळे घालून, स्वतःशी प्रेमाने संवाद साधताना.. ह्यापूर्वी शाब्बास मधुरा, I am pround of you, गुड लक.. असे स्वतःशी पुटपुटणे व्हायचे पण संवाद कधीच नाही.. तर आज पासून आरश्या समोर उभे राहून स्वतःशी संवाद साधायचा हे नक्की!! .. 

बघता बघता आयुष्यातली चार दशक सरली पण.. प्रत्येक दशकात परिपूर्ण जगले. शाळा कॉलेज मध्ये खूप दंगा मस्ती केली... बिनधास्त तारुण्य अनुभवले... घर संसार याची घडी बसवण्यात तिसरे चवथे दशक कधी सरले कळलेच नाही.. आता ह्या नवीन दशकात जाताना नवीन उमेद, नवीन उत्साहा बरोबर थोडी हुरहूर ही आहे... आज ह्या मैलाच्या आकड्यावर थोड्यावेळ विसावून गत आयुष्याबद्दल कृतग्नता व्यक्त करून पुढील दशकाची स्वप्ने रंगवायची आहेत... डोळे मिटून तारुण्यातून अलगद बाहेर पडताना पाहायचे आहे... ना तरुणी ना वयस्क ही फेज पुरेपूर एन्जॉय करायची आहे... जुन्या आवडीं  बरोबर नवीन आवडी जोपासायच्या आहेत.. नवीन दिशा, नवीन वाटा शोधायच्या आहेत...

कॉलेज मध्ये असताना मला लिहायला, कविता करायला आवडायचे. कॉलेज संपले आणि ही आवड ही मागे पडली. आता मला परत लिहायचे आहे. लिहिण्यातून व्यक्त व्हायचे आहे. डायरीत लिहिण्यापेक्षा एखादा ब्लॉग करायचा आहे. "मी मधुरा".. कसे आहे ब्लॉगचे हे नाव?

योगाभ्यास करायचा आहे.. हिमालयात ट्रेक करायचा आहे.. मानसरोवरला जायचे आहे..

परत एकदा स्टेज वर परफॉर्म करायचे आहे.. मनात असलेली डान्स येत नसल्याची, ग्रेसफुल नसल्याची भीती कायमची घालावयाची आहे. खरं तर शाळेमध्ये असताना स्टेज वर डान्स केले आहेत. कॉलेज मध्ये नाटकात काम ही केले आहे. पण... मध्येच कधी तरी "सेल्फ कॉन्फिडन्स" ची जागा "सेल्फ कॉन्शिअसनेस"ने कधी घेतली कळालेच नाही..

अँकोरिंग, आवाजातील चढ उतार शिकायचे आहेत.. कॅलिग्राफी शिकायची आहे.. रॅम्पवॉक करायचा आहे..

RV तून नॅशनल पार्क्सना जायचे आहे.... Wow!!

टॅटू काढायचा आहे.. तो ही पर्मनंट!...  केस "हाय लाईट" करायचे आहेत..

एकटीनेच कोठेतरी भटकायला जायचे आहे. नवीन पिढीच्या भाषेत सोलो ट्रिप.. पॉण्डेचारी???...

आयुष्य भरभरून जगायचे आहे...

आणि हे सगळे करत असताना आयुष्यातील जबाबदाऱ्या तितक्याच समर्थपणे पेलायच्या आहेत..

मग देणार ना माझी साथ?

-माझीच लाडकी मी.. 
२ मे २०१३